वाटेवरी सोबतीच्या
वेल संसाराची फुले…
खेळे चैतन्य अंगणी
आनंदाची खाण मुले…
जगण्याला अर्थ देई
किलबिल मोहमयी…
वेध आकाशाचा घेता
कष्टतात प्रेमापायी…
पंख लेकरा लाभता
जाई उडोनिया दूर…
जीवनाची रीत न्यारी
उरी दाटे हुरहुर…
जीव आनंदी तयाचा
उंच यशाच्या भराऱ्या…
समाधानी आईबाप
विसरून कळा साऱ्या…
पैसा भौतिक गरजा
पुरवल्या किती जरी…
भूक माया ममतेची
आधाराला वाटे खरी…
धुंदी यशाची चढता
मायबापा विसरती…
त्यांनी आयुष्य वाहिले
केल्या किती कसरती…
कसा वाढतो दुरावा
कर्तव्याच्या भुलथापा…
हतबल प्रेमापोटी
विरहात सुना खोपा…
सुख सुखात मानून
मन मारी किती वेळा…
डोळे पदरा पुसती
आठवणी होता गोळा…
उभी नाही आधाराला
काठी म्हातारपणाची…
अंधारते क्षणोक्षणी
भीती एकटेपणाची…
कधी येशील घराला
आस लावुनिया डोळा…
लेकरांच्या भेटीसाठी
तळमळे जीव भोळा…
-पूनम ज्ञानेश्वर जगताप
©Poonam Jagtap
Truly nice
Khup Sundar