शिवराज्याभिषेक मराठी कविता

मूळ प्राचीन हिंदवी

विश्वसत्ता जया हाती…

धर्म कर्म शिकवण

पुण्यपावन भूमाती…

युगे पिढ्यांनी जपला

पराक्रमाचा वारसा…

हिंदू सम्राट साम्राज्य

थोर संस्कृती आरसा…

भाग्यचक्र पालटता

पायी गुलामीची बेडी…

त्राही यवन उन्मादे

आस स्वातंत्र्याची तोडी…

प्रतिकूलता सावट

रयतेचे हालहाल…

रुजवण संघर्षाची

केली जिद्दीने कमाल…

राजे शहाजींचे स्वप्न

व्हावे स्वराज्य निर्माण…

उदरात जिजाऊच्या

सूर्य जन्मे तेजवान…

नैतिकता अधिष्ठान

माता जिजाऊच्या ठायी…

घडविले शिवबाला

रयतेच्या हितापायी…

नीति बुद्धी बाळकडू

मुक्ती क्रांतीचा जागर…

नांदी परिवर्तनाची

फिरे सोन्याचा नांगर…

दूरदृष्टी स्वराज्याची

शिवा शपथ कारण…

जिंकूनिया गडकिल्ले

बांधे स्वराज्य तोरण…

सामर्थ्याची घोडदौड

शत्रू अचंबित झाला…

लागे संकट चाहूल

पुरंदर तह केला…

वैरी कपट नीतिचा

नजरेत कैद राजे…

हातावर देता तुरी

चातुर्याचा डंका वाजे…

औरंग्याला फुटे घाम

मिळे वारंवार हार…

ख्याती होई शिवबाची

साता समुद्राच्या पार…

मावळाही निष्ठावान

गनिमीय कावा नीति…

धर्मासाठी बलिदान

दिली प्राणांची आहुती…

राजनीति रणनिती

श्रेष्ठ ठरे युक्तिवाद …

पाणी पाजुनी शत्रूला

रणी पुरविती नाद…

पायदळ घोडदळ

उभारले आरमार…

औरंग्याच्या छातीवरी

राज्य मराठा विस्तार…

स्वार्थ मत्सराच्या पोटी

कर्तृत्वाला न्याय नाही…

राज्याभिषेक घोषणा

गाजावाजा दिशा दाही…

आई भवानी पाठीशी

जगधीश्वर साथीला…

विधायक कार्यासाठी

रत्न लाभले मातीला…

विश्वेश्वर गागाभट्ट

क्षत्रिय मान्यता देई…

सात पवित्र सरिता

अभिषेक डोई होई…

मंत्रोच्चार गजरात

औक्षती सवाष्णी सोळा…

गडाडती तोफा नभी

होता संपन्न सोहळा…

दानधर्म शाही थाट

अलौकिक समारंभ…

रायगडी गर्दीलोट

नव्या युगाचा प्रारंभ…

पै पाहुणे सरदार

उपस्थित सोहळ्याला…

साथ अठरा पगडी

हर्ष होई मावळ्याला…

अष्टप्रधान मंडळ

सेवेसाठीच तत्पर…

जिजाऊचा आशिर्वाद

शिवबाच्या पाठीवर…

भारावली मनी प्रजा

सिंहासनी विराजता…

राजे झाले छत्रपती

क्षण सुवर्ण जगता…

शककर्ते सार्वभौम

हिंदूधर्म रक्षकर्ता…

शूर पराक्रमी राजा

पूर्ण जगी कीर्ति वार्ता…

मुक्त झाला हिंदुस्तान

गुलामी विळख्यातून…

नभी फडके भगवा

हिंदवी स्वराज्य शान…

रयतेसी मिळे राजा

घडी बसवी राज्याची …

छेद प्रारब्धवादाला

झेप उंच कर्तृत्वाची …

धर्माकरिता लढले

सदा शत्रूला नडले…

केली धडपड तेव्हा

राष्ट्र हिंदवी घडले…

न भूतो न भविष्यति

ऐसा राजा होणे नाही…

गाया थोरवी जयाची

हा जन्म पुरेसा नाही…

स्वप्नपूर्ती स्वराज्याची

सार्थ ठरता विश्वास…

अभिमाने घेता येतो

मी हिंदू म्हणूनी श्वास….

– पूनम ज्ञानेश्वर जगताप

©Poonam Jagtap

8 thoughts on “शिवराज्याभिषेक मराठी कविता”

  1. अतिशय सुंदर आणि काळानुसार सूत्रबद्ध मांडणी केली आहे, कविता वाचताना शिवरायांचा पूर्ण काळ नजरेसमोर उभा राहतो.
    महाराजांवर अशी सुंदर कविता तुमच्यामुळे वाचनात आली त्याबद्दल मनापासून धन्यवाद.
    कौतुक करण्यासाठी शब्दही अपुरे आहेत.

    Reply
  2. अतिशय सुंदर आणि काळानुसार सूत्रबद्ध मांडणी केली आहे, कविता वाचताना शिवरायांचा पूर्ण काळ नजरेसमोर उभा राहतो.
    महाराजांवर अशी सुंदर कविता तुमच्यामुळे वाचनात आली त्याबद्दल मनापासून धन्यवाद.
    कौतुक करण्यासाठी शब्दही अपुरे आहेत.

    Reply

Leave a Comment