संभ्रम मराठी कविता | Confusion Marathi Poem
हाती त्याची कदर न कुणाला
जे नाही त्या मृगजळाची ओढ…
माती होण्या हा अवधी पुरेसा
गैरसमजाला ना कशाची तोड…
भावाला ना उरले मोल जराही
नाण्यांनाच चढला भाव मोठा…
अस्थिपंजरी धडधड हृदयाची
जाणुनी हा सगळा डाव खोटा…
थेंबापरी आयुष्य हे अवघे
वाफेची ना ग्वाही कुणाला…
मनमंथने सार विचारामृत
संजीवनी देई मर्त्य तनाला…
साथ ही उरते भासापुरती
तरी भासाचा मोह सुटेना…
या भासाच्या लाटेवरती
सावलीचा जडदाह मिटेना…
प्राण अडकला वायुमध्ये
अन्नवस्त्रही ठरले दुय्यम…
दुःखाची धारही होई बोथट
पराकोटीचा वाढला संयम…
वारपलटवार पचवून सारे
भूत भविष्याची जुळते नाळ…
श्वासांत जीवंत उमेद योद्धा
वर्तमानी तगवून ठेवी काळ…
—पूनम जगताप
©Poonam Jagtap
Khup sundar…