सागरी किनारा

🌊🕊️✒️
उरी सागराच्या
अगणित लाटा…
वाऱ्याच्या वेगी
किनाऱ्याच्या वाटा…

आकाश सिंधुची
निळाई एकरूप…
विरले क्षितिज
अनोखेच रूप…

पाखरांचा थवा
स्वच्छंदी स्वैर उडे…
ओल्या रेतीमधे
शंखशिंपल्यांचे सडे…

सोनेरी किरणांचा
मिरवीत साज…
मनी काहुर माजवी
लाटांची गूढ गाज…

शिणल्या जीवाला
विरंगुळा थोडा…
स्पर्शूनी किनारा
लाटेस दर्याचा ओढा…

नीरनिधि धरणीची
मीलन विरहाची कथा…
प्रतिबिंब आयुष्याचे
मनामनाची ही व्यथा…
– पूनम जगताप
©Poonam Jagtap

Leave a Comment