माझं वास्तव मराठी कविता | My Reality Marathi Poem

माझं वास्तव मराठी कविता (शेतकर्‍याची वास्तविकता) |My Reality Marathi Poem(Ground reality of Farmer)

 

पीक मला लेकरावाणी …
काळी माती माझी माय
तिच्यातच सामावलोय मी
उरतं दुसरं नात काय?
जग म्हणतं मला पोशिंदा
पण माझा आधार कोण?
जगायला उभारी देतात
माझी चिल्लीपिल्ली दोन…
कष्टाला नाही घाबरत
मोडून परत उभा ठाकतो …
शून्याचं काय कौतुक
इथं रोजच ऋणात जगतो …
कर्ज काढून पेरणी करा
हीच दरवर्षीची बोंब…
वीजबिल लगेच भरलं नाही
तर जळतात कोवळे कोंब…
खताबियाणांसाठी मोठी
मोजावी लागते किंमत…
हाताशी आलेलं पीक गिळून
निसर्गही बघतो गंमत…
हौसमौज तर सोडाच
वेळेला मंगळसूत्र ठेवतो गहाण…
कारभारीण पण हिमतीने
सोबतीला उभी असते ठाम…
आम्ही पण शिकलोय की
अडाणी नाही कुणी…
पण भावांना पोरगी द्यायला
धजावत नाही कुणी…
पूर म्हणू नका की दुष्काळ
हक्क माझ्यावर दावतो…
लहरी निसर्ग बाबा
खूप कमी वेळा पावतो…
योजना आणि निधींचा
खूपदा वाहतो म्हणे पूर…
त्यापासून आमचा बांध
तरीही का राहतो बरं दूर…
घामाचे मोल मोजल्यावर
भरलेलं शिवार समाधान देतं…
म्हणायला फक्त व्यवसाय
शेतीचा खरा नफा कोण घेतं?
मरण तेव्हाच जवळ करतो
जेव्हा दिसत नाहीत वाटा…
याला खरं जबाबदार कोण
हे मग तुम्हीच सांगा आता…
धडपड जगण्यासाठी करणं
माझ्याकडे काय उरलयं यास्तव…
ही मी व्यथा नाही सांगत
जगतोय जे आहे माझं वास्तव…
— पूनम ज्ञानेश्वर जगताप
©Poonam_Jagtap

0 thoughts on “माझं वास्तव मराठी कविता | My Reality Marathi Poem”

  1. खुपच व्यवस्थित जुळणी केली आहेस शब्दांची आणि शेतकऱ्याच्या व्यथेचीही, पूनम

    Reply

Leave a Comment