निसर्ग मराठी कविता | Nature poem in Marathi

निसर्ग मराठी कविता | Nature poem in Marathi 

आस्तिकांचे विश्व
तर नास्तिकांचा देव…
दातृत्वचि कर्म धर्म
असा निसर्ग एकमेव…
अवघी सजीवसृष्टी
नियंत्रण चराचरावरी…
पृथ्वीचा पालनकर्ता
की ब्रह्मांडाचा हरी???
नभांगणी अखंड चाले
चंद्र सूर्याचा खेळ…
ताऱ्यांची टिमटिम बनवी
सुरेख रात्रीची वेळ…
झाडे, वेली, फळे
फुलांची सुंदर नक्षी…
पंखात भरूनी वारा
उंच बागडणारे पक्षी…
शृंखला भक्ष्य-भक्षकांची
जपणारे सगळे प्राणी…
वैविध्य दर्शविणारी
प्रत्येकाची अनोखी वाणी…
झरे, नद्या, तलावी
खोल समुद्रातळी…
उंच डोंगर पर्वतरांगा
दरीची मोहक खळी…
उन्हाच्या तप्त ज्वाला
चिंब बरसणार्‍या सरी…
गोड गुलाबी थंडी
ऋतूचक्रातुनी फिरी…
मृदगंध, पुष्पसुगंध
खळाळणारे पाणी…
इंद्रधनू तो उधळी रंग
मंजुळ कोकीळ गाणी…
हिमशिखरी,अभयारण्यी
वाळवंटी,ज्वालामुखी…
उसळणाऱ्या लाटा तर
फुललेली शिवारे सुखी…
अन्न, वस्त्र, निवारा
जीवनदायिनी शुद्ध हवा…
गरजपूर्तिसाठी तत्पर
नैसर्गिक अमूल्य ठेवा…
निसर्गाच्या दानाचा
उतमात केला जर…
लागे भोगावा दुष्काळ
कधी भूकंप, महापूर…
मानवी उत्क्रांती
नष्ट करू पाही सृष्टी…
निसर्ग प्रकोपाच्या पुढे
हतबल त्याची दूरदृष्टी…
तो आहे म्हणून आपण
आपणामुळे तो कधीच नाही…
विचार खोल व्हावा यावर
वेळ उपरतीची वाट पाही…
जगावा या जन्मी
पृथ्वीवरील हा स्वर्ग…
जपा मनोभावे त्याला
हाच सर्वोत्तम मार्ग…
—पूनम ज्ञानेश्वर जगताप
©Poonam_Jagtap

0 thoughts on “निसर्ग मराठी कविता | Nature poem in Marathi”

  1. तुझ्या शब्दांची व्याप्ती पण नक्कीच इतकी आहे पूनम की निसर्गाला सुंदर शब्दांत गुंफण्याचा तुझा प्रयत्न कौतुकास्पदच आहे. खूप छान.

    Reply

Leave a Comment