प्रवास मराठी कविता | Travel Marathi Poem

प्रवास मराठी कविता | Travel Marathi Poem

 

आदि ते अंत सुरू
एक अखंड प्रवास…
बहुउद्देशाअंतर्गत
त्यास नावीन्याचा ध्यास…
प्रत्येकाला मर्यादित
आयुष्याचा कालावधी…
मोजावे लागे जगताना
मूल्य क्षणांचे ते आधी…
श्‍वास पहिला ते अखेरचा
प्रत्येक जीवा संधी समान…
जगण्याचा या प्रवासात
भावानुभवांना उधाण…
संवाद मनामनांचा
खुलवी जिव्हाळ्याचे रंग…
प्रेमाच्या प्रवासाला
गैरसमजाचा सुरुंग…
प्रभाव सद्गुणांचा
प्रवास यशाचा ऊर्ध्वगामी…
अपयश अवगुणा
दिशा त्याची अधोगामी…
बाल्य, तारुण्य, वृद्धत्व
भिन्न स्तरे वाहत राही…
दोन श्वासांच्या अंतरी
जीवनगंगा ही प्रवाही…
सहप्रवासी नातलग
साथ स्नेही ते जपती…
चढ उतारांच्या साक्षीला
हितशत्रूही सोबती…
चंचल मन हे क्षणात
विश्वाचा घेते ठाव…
अनुभव देती त्याला
अंतर्मुख होण्या वाव…
विचार तितक्या वाटा
मन शोधे अंतिम सत्य…
शोधाच्या मार्गावरही
भास पूर्णत्वाचे फक्त…
पिढी पिढी विचारांचे
संक्रमण सुरू राही…
परतीच्या प्रवासाला
मन तृप्त होऊनिया जाई…
— पूनम ज्ञानेश्वर जगताप
©Poonam_jagtap

11 thoughts on “प्रवास मराठी कविता | Travel Marathi Poem”

  1. छान लिहिलंय. प्रत्येकचा जगण्याचा अनुभव एका कवितेत छान कथित केला आहे. खूप सुंदर पुनम लिहित रहा आणि आम्हा शिक्षकांना वाचण्याची संधी देत जा. सगळ्यांनाच लिहित राहाणे कदाचित नसेल जमत पण तुझ्या माध्यमातून आम्ही जे आनंद उपभोगत आहोत

    Reply

Leave a Comment