बाप मराठी कविता | Father Marathi Poem
जग दाखविणारा खांदा
सोबतीला आधाराचे बोट…
नेहमी हसरा चेहरा दाखवी
गिळून चुपचाप दुःखाचे घोट…
चालण्यासोबत भरारीला
मोकळे आभाळ दिमतीला…
अवचित तोल गेला जरी
मानावं सावरणाऱ्या हिंमतीला…
दिनरात भिंगरी पायाला
कष्टाने कधीच नाही थकत…
कितीही संकटे आली तरी
हा कणा कधीच नाही झुकत…
प्रेम व्यक्त करण्यासाठी
शब्द मनात गोठून राही…
पाणावणारे डोळेच मग
खरा भाव बोलून पाही…
जबाबदारी जगण्याचे अंग
प्रतिष्ठाही लागते पणाला…
कुटुंबाचा आधार बनता
स्वतःस विसरणं क्षणाक्षणाला…
कणाकणाचं हे झिजणं
मोजाया ना कोणते मोजमाप…
त्याची जागा ना घेई कोणी
एकच जगी या असतो बाप…
—पूनम ज्ञानेश्वर जगताप
©Poonam Jagtap

Great lyrics 👌
Happy Fathers Day