सापशिडी मराठी कविता | Snake and Ladder Marathi Poem

सापशिडी मराठी कविता | Snake and Ladder Marathi Poem

 

असा कसा अचानक
सूर हरवून जातो दूर…
वाटतं सगळंच निरस
अनामिक अशी हुरहूर…
पावलेही चुकतात वाट
सुटतात क्षणात धागेदोरे…
पुसट होत जाती क्षणात 
वाटणारे शब्दस्पर्श खरे…
भीतीही वाटे अंधुकशी 
सावल्यांचा ना उमगे खेळ…
भोवर्‍यासोबत चक्राकार 
भोवळ दाखवून देते वेळ… 
कंदील सोबत असला जरी 
काजळी गदड़ करी अंधार… 
काळजी पोखरत जाते खोल 
अभद्र विचारांना चढते धार… 
अवकाळी पाडणारा पाऊस 
ओबडधोबड गारांची सर… 
श्वापदांच्या विव्हळण्याने 
तर्कवितर्कांत पडतो भर… 
उतरत्या रात्रीत वर चढे 
शंकाकुशंकांची वेधक उडी… 
बिनबुडाची वाटली तरी 
भयाची भेदक सापशिडी… 
         —पूनम ज्ञानेश्वर जगताप
©Poonam Jagtap

0 thoughts on “सापशिडी मराठी कविता | Snake and Ladder Marathi Poem”

 1. कोणी म्हणतो बुद्धिबळ,
  तर कोणी म्हणतो साप शिडी..

  काही म्हणतात प्रवास आहे,
  तर काही म्हणतात रेल गाडी…

  कोणी म्हणेल ही मोहमाया आहे….
  प्रत्येकाची स्वतःची वेगळी एक कथा आहे,
  आयुष्याची प्रत्येकाची त्याची वेगळी व्याख्या आहे…..

  आयुष्याला प्रत्येकाने काहीतरी उपमा दिलेली असते,
  शेवटी, प्रत्येकाला आपल्या जीवनात आशावादाने पुढे जावे लागते…..😊

  Reply

Leave a Comment