गृहिणी मराठी कविता | Homemaker Marathi Poem

गृहिणी मराठी कविता | Homemaker Marathi Poem

 

 

घर आपले सावरण्या

उभा जन्म ती वाहते…
समाधानी नजरेने ती
बहर संसाराचा पाहते…
आपल्या कुटुंबासाठी
झिजते चंदनासारखी…
क्वचितच एखादा कुणी
तिच्या कष्टाला पारखी…
विसरून जाते दुखण्याला
लेकरांच्या काळजीपोटी…
उसने का असेना ते हसू
खेळवते स्वतःच्या ओठी…
तिच्यासाठी गोतावळा
हेच व्यापक विश्व वाटे…
प्रत्येक नात्याला सांभाळत
उरी तिच्या फक्त प्रेम दाटे…
सासरी नांदत असताना
मनी माहेराची लागे ओढ…
माहेरी असताना सासरच्या
जबाबदारीची दोरी सोड…
दुसऱ्यासाठी जगणं हा
मानते आपला खरा धर्म…
त्याला अनुसरून जन्मभर
करते असते ती सर्व कर्म…
तिच्यामुळे पूर्ण घरात
नांदत असते गोकुळ…
ती घरात नसेल तेव्हातर
होतात सगळे व्याकुळ…
शिस्त, सेवा, सहनशीलता
सर्वगुणसंपन्नतेची ती खाण…
कितीतरी भूमिकांतून सहज
ठसा पाडते स्वतःचा छान…
कुटुंबाचा हा आधारस्तंभ
गृहीत कितीदा तिला धरतो …
कुणी करते का खरी किंमत
प्रेमापोटी स्वाभिमान हरतो…
वाहते सतत फक्त काळजी
तिला जेव्हा कधी बघावे…
तिने स्वतःसाठी कोषातून
कधीतरी थोडे बाहेर निघावे…
दिसत असतो वागण्यातून
मोठेपणाचा अनोखा संयम…
सर्वस्‍व देवून मनी स्वीकारते
दुय्यमतेचा प्रतिसाद कायम…
सृष्टीची सर्वोत्तम रचना ती
भविष्याची प्राणवाहिनी…
शक्तीचे अधिष्ठान असे ती
प्रत्येक घराघरातील गृहिणी…
—पूनम जगताप
©Poonam_jagtap

Leave a Comment