गोष्ट एका जोडीची मराठी कविता | Story of a Couple Marathi Poem

गोष्ट एका जोडीची मराठी कविता |Story of a Couple Marathi Poem

 

एका गोड जोडीची
गोष्ट आहे छोटी…
दोघांनाही भेटून
गंमत वाटेल मोठी…
दोघांनाही स्वतंत्र
आहे स्वतःची ओळख…
एकमेकांशिवाय आयुष्य
जणू अमावस्येच्या काळोख…
सतत प्रेरणा देणं
हा त्याचा स्थायीभाव…
किंमतशून्य सगळं
जेव्हा जाणवे त्याचा अभाव…
ही ची ओळख मात्र
ती भयंकर कष्टाळू…
मधुनच झलक दाखवी
वेड मन तिचं स्वप्नाळू…
ती होती कामात मग्न
जेव्हा दिसली होती त्याला…
तिचे श्रम पाहून
त्यालाही हुरूप आला…
प्रामाणिकपणा तिचा
त्याला खूप भावला…
प्रेरणा देऊन त्याने
आशेचा मार्ग दावला…
सतत उत्साही असायची
ती सोबतीने त्याच्या…
त्यालाही भारी वाटे
बनून जोडीदार तिचा…
दोघेही परस्परांना
होते अगदी पूरक…
मिळून पाहू लागले
स्वप्न एक सुरेख…
स्वप्नांच्या दिशेने दोघांचा
प्रवास झाला चालू…
रस्त्यात एक जरी थकला
तरी गाडी लागे डुलु…
एव्हाना एकमेकांची
झाली त्यांना सवय…
परस्परांना हरवण्याचे
वाटू लागलं भय…
पडत्या काळात ते
लागत होते आवरू…
एकमेकांशिवाय ते
नव्हते शकत सावरू…
नशीबही लागले पाघळू
पाहून दोघांची चिकाटी…
पोहोचले होते आता ते
त्यांच्या स्वप्नपूर्तीपाशी…
परस्पर सहकार्याने त्यांनी
चाखले होते यश…
आनंद साजरा करताना
विसरून गेले अपयश…
दोघांच्या या जोडीचे
अजूनही नाव कळले नसेल…
दोघांशिवाय हे आयुष्य
केवळ निरर्थक भासेल…
तिचे नाव ‘मेहनत’
आणि ‘आत्मविश्वास’ तो…
सूर जुळता त्यांचा
लाभ उन्नतीचा पावतो…
विधिलिखित ही जोडी
जेव्हा कधी येते एकत्र…
यशाची हमख़ास खात्री
सहनशीलता लागते मात्र…
प्रत्येकालाच लाभलयं
ह्या जोडीचे वरदान…
कमजोर न पडण्याचे
फक्त ठेवावे लागते भान…
छोटीशी ही गोष्ट जर
आवडली असेल तुम्हाला…
प्रतिसादातून तुमच्या
कळू द्या ते आम्हाला…
—पूनम ज्ञानेश्वर जगताप
© Poonam_jagtap

0 thoughts on “गोष्ट एका जोडीची मराठी कविता | Story of a Couple Marathi Poem”

Leave a Comment