गोगलगाय मराठी कविता | Snail Marathi Poem

गोगलगाय मराठी कविता | Snail Marathi Poem

ती चालत असते हळूहळू आपल्याच लयीत…
पाठीवरचे ओझे सांभाळत…
जे तिच्यासाठी कधी ओझे नसतेच …
ती असते तिच्या निवाऱ्याची जागा…
संरक्षणासाठी आणि निवांत झोपण्यासाठी…
दररोज चालू असतो तिचा प्रवास न थकता… काट्याकुट्यांमधून, दगड कातळांवरुन…
गवतपानांवरुन, कधी डबक्याच्या काठावरून…
तर कधी झाडांच्या खोडांवरून…
चालताना मागे जरी पाहत नसली तरी तिची खूण ती तिच्या माघारी सोडत असते…
ती कुठे चालली आहे हे तिला जरी माहीत नसले तरी तिचा मागोवा घेतला जातो दुसर्‍यांकडून…
तिची मजल कुठपर्यंत जातेय हे तपासायला…
ती शिकवतं असते हळूहळू जरी चालले तरी प्रवास चालूच असतो…
स्वतःचा अदमास घेत आणि स्वतःच्याच धुंदीत चालत राहायचं अविरत… अखंड …
जोपर्यंत थकत नाही तोपर्यंत…
थकलो की थोडी विश्रांती घ्यायची…
जायचे आपल्याच कोशात पुन्हा चालण्यासाठी लागणारी ऊर्जा एकवटायला…
उठून पुन्हा नव्याने सुरू करायचे चालायला…
परत नव्या काट्याकुट्यांमधून, दगड कातळांवरुन,
गवतपानांवरुन, कधी डबक्याच्या काठावरून…
तर कधी झाडांच्या खोडांवरुन…
हळूहळू… पण चालणं मात्र चालू ठेवायचे…
                                —पूनम ज्ञानेश्वर जगताप
©Poonam_jagtap

0 thoughts on “गोगलगाय मराठी कविता | Snail Marathi Poem”

  1. 👌 सुंदर असते गोगलगाय तिच्या कडून समजले जगायचं कस , कस जगायचं..!!👍

    Reply

Leave a Comment